Ad will apear here
Next
ऑस्करविजेता ‘पॅरासाइट’ : आदिम सामाजिक प्रश्नांवरचं महत्त्वपूर्ण व रंजक भाष्य


‘बाँग-जुन-हो’ या दिग्दर्शकाच्या ‘पॅरासाइट’ नावाच्या नव्या चित्रपटानं सध्या संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात या चित्रपटानं ‘बेस्ट पिक्चर’, ‘बेस्ट डिरेक्टर’, ‘बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले’ आणि ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या चारही विभागातले प्रथम क्रमांकाचे पुरस्कार पटकावले आहेत. ‘डार्क कॉमिक थ्रिलर’ असा आगळावेगळा जान्रं असणाऱ्या या चित्रपटाच्या अंतरंगात खूप काही दडलेलं आहे. साधीसरळ कथा आणि विनोदाच्या अंगाने जाणारा हा चित्रपट, त्याच्या पूर्ण लांबीच्या साधारण मध्यावर आल्यानंतर आपले वेगळे रंग दाखवायला सुरुवात करतो, घटना टोकदार होतात, अधिक वेगवानपणे घडू लागतात आणि चित्रपट शेवटाकडे येईपर्यंत प्रेक्षक अक्षरश: थक्क होऊन जातो.

सामाजिक उतरंड, विविध सामाजिक स्तरांमधला संघर्ष आणि आर्थिक विषमता या आदिम काळापासून अस्तित्वात असणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर हा चित्रपट आधारलेला आहे. दिग्दर्शक ‘बाँग-जुन-हो’ आपल्या या चित्रपटाला, ‘स्टेअरवे मूव्ही’ असं संबोधतो. सामाजिक उतरंड दाखवण्याकरिता तो कधी जिने, बंकर्स आणि तळघरासारख्या ढोबळ प्रतीकांचा वापर करतो, तर कधी दक्षिण कोरियामधल्या तरुणाईच्या ओठी असणाऱ्या, देशातील खालावलेल्या अर्थव्यवस्थेवर कोरडे ओढणाऱ्या, ‘हेल जोसॅन’सारख्या थट्टेखोर (सटायरिकल) व्याख्याही तो विचारात घेतो. रस्त्याच्याही एक मजला खालच्या पातळीवर एका कुबट, तळघरसदृश फ्लॅटमध्ये वास्तव्यास असणारे ‘किम’ कुटुंबीय आणि त्यांची दिनचर्या सुरुवातीच्या काही मिनिटांतच प्रेक्षकाच्या परिचयाची होते. अक्षरश: ‘हातावर पोट’ असणारं किम कुटुंब, विविध तऱ्हेची कामं करून आपला उदरनिर्वाह करत असतं. काम नाही, तर पैसे नाहीत आणि पैसे नाहीत तर अन्न नाही, हे परस्परावलंबी चक्र, किम कुटुंबीयांच्या अंगवळणी पडलेलं असतं. अशा या कुटुंबात ‘की-जोंग’ आणि ‘की-वू’ अशी वयात आलेली तरुण भावंडेही असतात. त्यांची जगण्याची पद्धतही वेगळी आणि तारुण्यसुलभ बेपर्वाईची असते. ‘स्ट्रीटस्मार्ट’ प्रकारची. हलाखीची परिस्थिती असूनही, किम कुटुंबीयांची मनस्थिती मात्र त्यांनी प्रयत्नपूर्वक उत्तम राखलेली असते. येईल त्या अडचणींतून मार्ग काढण्याकरिता ते सज्ज असतात.



एके दिवशी ‘की-वू’ या किम कुटुंबातील तरुण मुलाचा मित्र त्याच्यावर एक जबाबदारी सोपवतो. त्यानुसार, ‘पार्क’ या अतिश्रीमंत कुटुंबातील मुलगी ‘दा-हाय’करिता तिच्या घरी खासगी शिकवणी घेणारा शिक्षक म्हणून ‘की-वू’ कामावर रुजू होतो. पार्क कुटुंबीयांच्या अफाट आर्थिक ताकदीचा अंदाज ‘की-वू’ला येतो. त्यानुसार तो त्याची बहीण ‘की-जोंग’लाही ‘आर्ट थेरपिस्ट’ म्हणून ‘पार्क’ कुटुंबात आणतो; पण ती त्याची स्वत:ची बहीण आहे, हे मात्र गुप्त ठेवून. याच प्रकारे खटपटी-लटपटी करून, प्रसंगी अनीतीनं वागून, संपूर्ण किम कुटुंब हे पार्क कुटुंबात एखाद्या बांडगुळाप्रमाणे शिरकाव करतं आणि एखाद्या विषवल्लीप्रमाणे यथावकाश फोफावू लागतं. आपल्या घरात वावरणाऱ्या या व्यक्ती, म्हणजे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत, हे पार्क कुटुंबाच्या गावीही नसतं. काही दिवस जातात, तसं किम कुटुंबीय पार्क कुटुंबाचा विश्वास संपादन करतात. त्यांच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी सोपवून, पार्क कुटुंबीय एके दिवशी बाहेरगावी जातात. या टप्प्यापासून पुढे, हा चित्रपट एक अकल्पित असं वळण घेतो आणि त्याच्या मूळ मुद्द्यांकडे वळतो. 



सामाजिक उतरंड, आर्थिक विषमता, परस्परावलंबित्व, यातून उद्भवणाऱ्या अडचणी, समाजाच्या विविध आर्थिक स्तरांमध्ये असणाऱ्या लोकांच्या जगण्यातील विवंचना, आपसांतील तेढ, ‘मोठं’ व्हायची प्रत्येकाची स्वप्नं, आकांक्षा, या आकांक्षांपोटी घेतलेले बरे-वाईट निर्णय, त्यातून रंगत जाणारं सूडनाट्य, शेवटाकडे येताना अचानकच घडणारा रक्तरंजित प्रसंग आणि सगळ्यात शेवटी येणारी खिन्नता, हे सगळंच दिग्दर्शक आणि अभिनेते अचाट ताकदीनं उभं करतात आणि प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेतात. अतिशय गांभीर्याने चर्चा करण्याजोगे हे रुक्ष, तरीही महत्त्वपूर्ण विषय, दिग्दर्शक व पटकथाकार मोठ्या खुबीने आणि रंजक पद्धतीने मांडतात. ‘डार्क कॉमिक थ्रिलर’ या आगळ्यावेगळ्या जान्रंच्या मार्गानं जातात आणि या पद्धतीची अत्यंत वेगळी वाट चोखाळूनही प्रेक्षकाला विचारात पाडतात. 

सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा विषय आपल्या गर्भात दडवून असणारा ‘पॅरासाइट’ हा चित्रपट आपल्यासमोर एक रंजक कहाणी मांडतो. ही कहाणी आपल्या कुणाहीसोबत घडू शकते. किंबहुना, अगदी छोट्या प्रमाणात का होईना, पण चित्रपटातील घटनांशी साधर्म्य असणारे असंख्य छोटे-मोठे प्रसंग आपल्या रोजच्या दिनक्रमात घडत असतात. फक्त अशा प्रसंगांचं गांभीर्य आपल्या पूर्णपणे लक्षात येत नाही. ‘पॅरासाइट’ आपल्यासमोर आरसा ठेवतो, ज्यात आपलं आणि आपल्या भोवताली समाजात वावरणाऱ्या असंख्य घटकांचं प्रतिबिंब आपण स्वच्छपणे पाहू शकतो. हा चित्रपट अनेक महत्त्वाच्या मुद्दयांवर प्रभावी भाष्य करतो. कर्मसिद्धांत अधोरेखित करतो आणि प्रेक्षकाच्या दीर्घ काळ स्मरणात राहून त्याला चिंतन करावयास भाग पाडतो.



‘मिसेस पार्क’ आणि ‘दे-साँग’ ह्या व्यक्तिरेखा, दिग्दर्शकाच्या मते समाजातील एका स्तराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत. यांचं लक्ष, केवळ थेटपणे दिसणाऱ्या गोष्टींवर केंद्रित आहे. त्या गोष्टींचा खरा अर्थ किंवा त्यामागच्या भूमिकेशी त्यांना काहीएक घेणंदेणं नाही. जवळपास सर्वच विकसनशील देशांमध्ये असलेल्या सर्वसाधारण जनतेप्रमाणेच, अमेरिका आणि अमेरिकन वस्तूंचं आकर्षण मनात असणारी आणि त्याच गोष्टींना आदर्श मानणारी ही पात्रं आहेत. मिसेस पार्क जेव्हा ‘नेटिव्ह अमेरिकन’ वस्तूंची खरेदी करतात आणि मुलाच्या आग्रहाखातर ‘थीम पार्टी’चं आयोजन करतात, तेव्हा त्यांच्या मनात, ‘नेटिव्ह अमेरिकन’ या संकल्पनेमागची व्याप्ती व त्यामागे दडलेला काळा, रक्तरंजित इतिहास याविषयीचे कसलेही विचार नसतात. ‘चे गवेरा’ आणि त्यानं केलेल्या क्रांतीविषयी सुतराम कल्पना नसलेले अनेक जण, त्याचं चित्र छापलेले टी-शर्टस् घालून आपल्या आजूबाजूला वावरताना आपण कायमच पाहतो. अगदी अशाच विचारधारणेची प्रतिकृती, म्हणजे या दोन व्यक्तिरेखा आहेत.

पूर्वार्धात नर्मविनोदी वळणानं जाणारा हा चित्रपट, उत्तरार्धात मात्र गडद, गहिरे रंग धारण करतो. अनेक धक्कादायक आणि विचित्र वळणे घेत जातो. माणसांच्या बदलत राहणाऱ्या चित्रविचित्र भूमिका तटस्थपणे दाखवतो. नीती-अनीतीच्या मधे दोलायमान अवस्थेत जगणारी माणसे दर्शवतो. हादरवणारी काही सत्ये मांडतो आणि असं प्रत्यक्षात आपल्यासोबत घडलं, तर काय होईल, या कल्पनेनं प्रेक्षकाला भेदरवतोदेखील. जिने, तळघरं, बेसमेंट अपार्टमेंट, ठरावीक रंग, चित्रे, यांसारखी ढोबळ प्रतीके तर वापरतोच. शिवाय, शेवटाकडे येताना ‘नेटिव्ह अमेरिकन थीम पार्टी’ हे जबरदस्त रूपकही योजतो. ‘स्कॉलर्स रॉक’चं प्रतीक आणि त्याचा खासा वापरही करतो. शेवटच्या पार्टीमधला प्रसंग किंचित बीभत्सपणाने रंगवताना ‘पॅरासाइट’ या मूळ संकल्पनेवर, उपरेपणावर मोठं मार्मिक भाष्य करतो. नेमकं उपरं कोण व असं का, याबद्दल विचार करायला लावतो. वसाहतवाद, हुकूमशाही, चंगळवाद हे महत्त्वाचे मुद्देही लख्खपणे मांडतो आणि भौतिक सुखाच्या प्राप्तीकरिता सततच्या वाढत्या हव्यासापोटी केलेल्या कर्मांचे परिणाम ठळकपणे समोर ठेवून, प्रेक्षकाची या संदर्भात दिवसेंदिवस बोथट होत जाणारी जाणीव जागी करतो.

दिग्दर्शक बाँग-जुन-हो

मनुष्यजातीचा सर्वच बाबतींत दिवसेंदिवस वाढता असणारा हव्यास, भोगवादी वृत्ती, ग्लोबल वॉर्मिंग, ढासळती अर्थव्यवस्था, वातावरणात होणारे बदल, यामुळे निसर्गाचा ढळणारा तोल, त्यानुसार होणारा प्रकोप इत्यादी मुद्द्यांनाही हा चित्रपट जाताजाता स्पर्श करतो. सर्वांत शेवटचा प्रसंग चित्रित करताना दिग्दर्शक ‘कू-ड-ग्रास’ (Coup-de-grace) म्हणजेच सततच्या असह्य मरण यातनांतून चुटकीसरशी मुक्ती देणाऱ्या दयामरणाशी थेट संबंध जोडतो. ‘श्युअरफायर’ प्रकारचा हा संपूर्णपणे चित्रभाषेत असणारा हा प्रसंग, क्लायमॅक्सच्या भागात, चित्रपट जो संभ्रम निर्माण करतो, त्यावर एक निश्चित, ठोस असं उत्तर मिळवून देतो. दिग्दर्शक, कथा-पटकथाकार, संकलक, संगीत दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्या उत्तम कामगिरीमुळे महत्त्वाच्या विषयांवर मार्मिक भाष्य करणारा, हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर पोहोचतो. आजच्या एकूण वातावरणाचा आढावा घेणारा, मनुष्याच्या मनोवृत्तींचं सचित्र विश्वरूप दर्शन घडवणारा आणि त्यावर नेमकी टिप्पणी करणारा, हा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे, यात कोणतीही शंका नाही.

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZPYCJ
Prapurika Joshi खरंच बघताना काटा येतो अंगावर...कधी गरिबी चा विचार, तर कधी त्यांचा स्वार्थ ..असे मत बदलत राहते..
Prapurika Joshi मला एक किस्सा आठवला..relate d,कर्वे रोड नळ स्टॉप वर माझ्या ताई चा बंगला.. तिच्या सासू बाई एकट्याच राहत असताना,सोबत म्हणून एक बाई ठेवली,हळू हळू एका खोलीत तिची मुलगी,मग नवरा ही राहायला आले...तेव्हा हे दोघे अमेरिका मध्ये होते,आल्यावर आपल्याला जावे लागेल ,हे उमजून त्या बाई ने चक्क एक दिवशी सासूबाई ना खुर्चीत दोरी नी बांधून सर्व अंगावरचे दागिने काढून पळ काढला...4बांगड्या,2 पटल्या,एक गळ्याची पोत...,...नशीब त्या ,ह्या धक्यातून साव र ल्या
Similar Posts
पुरुष स्त्रीमध्ये नेमके काय शोधत असतो? ‘What man really looks in woman?’ हा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडत असावा. तसाच तो पुरुषांच्याही कायम डोक्यात असतोच! या प्रश्नाचे उत्तर ‘स्लीपलेस इन सिअॅटल’ या हॉलिवूड चित्रपटातून मिळते. या चित्रपटाबद्दल श्रीराम जोशी यांनी लिहिलेले हे चार शब्द...
उत्खनन १९३९च्या मे महिन्यात उत्खनन करणारा बेसिल ब्राउन एडिथ प्रिटी या महिलेच्या ‘सफोक’ या इंग्लंडमधल्या परगण्यात खोदकाम करायला हजर होतो. पुरातत्त्वशास्त्रातलं आजतागायत अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं एक उत्खनन तो करतो. ‘द डिग’ या नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची ही मध्यवर्ती संकल्पना. हा चित्रपट
‘पेले’ डॉक्युमेंटरी : ब्राझीलमधल्या एका कालपटाचा इतिहास ‘तो देशाचा विजय होता. तो (फुटबॉल या) खेळाचा विजय नव्हता...’ ‘पेले’ या नेटफ्लिक्सवरच्या डॉक्युमेंटरीमध्ये १३६३ गेम्समध्ये १२७९ गोल करणारा पेले स्वत: हे शेवटचं वाक्य म्हणतो. यामागचे संदर्भ ती डॉक्युमेंटरी पाहताना कळत जातात.
असा प्रीतीचा नाद अनाहत..! चित्रपटाच्या शेवटी ‘पण हे सगळं करून तू आनंदात राहशील का’ या जेरीच्या प्रश्नावर शार्लोट म्हणते, ‘आपल्या दोघांनाच जाणवणारा आपल्यातल्या प्रेमाचा तो मंतरलेला प्रदेश आपल्यात जिवंत असताना, प्रेमाचा अनाहत नाद आपल्याला ऐकू येत असताना, फक्त आपल्या नजरेला दिसणारा चांदण्यांचा झिलमिलता प्रकाश समोर असताना आपण चंद्राची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language